लातूर-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी सर्वाधिक 53 रुग्ण आढळून आल्याने लातूरकरांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे 18 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात जसजशी नमुन्यांच्या तपासणीची संख्या वाढत आहे अगदी त्याच वेगाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. गुरुवारी 392 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. त्यापैकी 271 निगेटिव्ह तर 53 अहवाल पॉझिटिव्ह असून 43 प्रलंबित आहेत व 03 रद्द करण्यात आलेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लातूर शहरातील 29, उदगीर तालुक्यातील 11, अहमदपूर 05, निलंगा 06 तर औसा येथील दोघांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी गुरुवारी 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून लातूरकरांच्या चिंतेत भर पडतेय.सर्वसामान्य नागरिक आता लॉकडाऊन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत आहेत. जिल्हा प्रशासन येथील मृत्युदर कमी असल्याचे सांगत आहे. एका दिवसात 53 रुग्णांची झालेली वाढ ही आतापर्यंतची सर्वाधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार हे देखील पहावे लागणार आहे.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 272 आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 322 वर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 28 जणांचा बळी गेला आहे.