लातूर- गेल्या चार दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर योगवाशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत असलेल्या तिन्हीही विद्यालयातील शिक्षकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील महिला शिक्षकांनी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली जामदार यांच्या कक्षात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तनुजा गंभीरे आणि विरंगना चामे, अशी आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. या दोन्ही शिक्षकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
योगवाशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांमध्ये संस्थासचिव रामदास पवार यांचा मनमानी कारभार होत असून अधिकतर पदावर नातेवाईकांचा समावेश करण्यात आला आहे. तर शाळेच्या इमारतीसाठी शिक्षकांकडून घेतलेले पैसे परत करावेत, रंगकामासाठी प्रत्येक शिक्षकाकडून घेतलेले 28 हजार रुपये परत करावे, शिवाय महिला शिक्षकांना आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल संस्थासचिव व त्यांचा मुलगा किरण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, नियमित पगार देण्यात यावा, या मागणीसाठी 9 सहशिक्षकांसह 1 मुख्याध्यापक आणि 6 सहशिक्षकांनी उपोषण सुरू केले आहे.