लातूर -बेलकुंड गावाचा कारभार हकणारे सरपंच-उपसरपंच हेच गेल्या दोन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. गावातील मुख्य ठिकाणीच दारू विक्री केली जात असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने याचा परवाना रद्द करण्याची मागणी या लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.
निवेदनाद्वारे आरोप
येथील ग्रामपंचायतच्या हद्दीत एका बारला राज्य उत्पादन शुल्कच्या ब विभागाने परवानगी दिली आहे. सदरील परवानगी बेकायदेशीर असून ती 3 दिवसांत रद्द करावी, असे निवेदन देऊनही परवाना रद्द न झाल्याने बेलकुंडचे सरपंच विष्णू कोळी व उपसरपंच सचिन पवार यांनी सोमवारपासून बेलकुंडच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. बेलकुंड येथील हद्दीत औसा-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका बार अँड रेस्टॉरंट थाटण्यात आले आहे. याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली असून ही परवानगी बेकायदेशीर आहे. तसेच या प्रकरणी लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क व विभाग यांना व संबंधित कार्यालयात अशा प्रकारची कुठलीही परवानगी देण्यात येऊ नये, असा पत्रव्यवहार ग्रामपंचायत बेलकुंडमार्फत करण्यात आला होता. तरीही संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही परवानगी दिली असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
आमरण उपोषणाचा इशारा
सदरील परवानगी येत्या तीन दिवसात रद्द करण्यात यावी अन्यथा बेलकुंड ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बेलकुंडचे सरपंच विष्णू कोळी व उपसरपंच सचिन पवार यांनी निवेदन देताना दिला होता. मात्र, कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने आता सरपंच आणि उपसरपंच हेच उपोषणाला बसले आहेत. विशेष म्हणजे ज्या कार्यालयातून लोकप्रतिनिधी कारभार हकतात त्याच कार्यालयाच्या परिसरात सरपंच- उपसरपंच हे उपोषणाला बसले आहेत. शिवाय कार्यवाहीसंदर्भात पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देण्यात आले आहे.