लातूर -लातूर तालुक्यातील गाधवड येथील एका तरुण शेतकऱ्यानी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. वैजनाथ रामलिंग भुजबळ असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
मांजरा पट्टा आणि शेतीसाठी सुपीक जमीन ही लातूरची भौगोलिक स्थिती असतानाही गेल्या ३ वर्षांपासून हा जिल्हा शेतकरी आत्महत्येने ग्रासला आहे. वर्षभरात ९९ शेतकऱ्यांनी कर्जाचा वाढता डोंगर, नापिकी अशा शेतीसंबंधीच्या प्रश्नावरून जीवन संपिवले आहे. कर्जमाफीचा तिढा कायम असतानाच २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले आहे. कर्जमाफीबद्दलच्या अटी-नियम दिवसागणिक बदलत आहेत. त्यामुळे या निर्णयाबद्दल नेत्यांचे राजकारण होत आहे. मात्र, प्रत्यक्ष आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची अवस्था ही भीषण असून कर्ता पुरुषच गेल्याने आता जगावे कसे असा सवाल या कुटुंबीयापुढे आहे.
गत आठवड्यात लातूर तालुक्यातील गाधवड येथील तरुण शेतकरी वैजनाथ रामलिंग भुजबळ यांनी वाढत्या कर्जाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केली होती. शासकीय बँकेचे आणि बचत गटाचे असे अडीच लाखांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होते. यातच आई-वडिलांसह मुलाबाळांचा सांभाळ कसा करावा. शिवाय यंदाच्या कर्जमाफीत तरी समावेश होतो कि नाही, या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. शेती बरोबरच पेंटिंगची कामे करणाऱ्या वैजनाथने असे कृत्य केल्याने आता जगावे कसे असा सवाल त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे. तर दुसरीकडे संपूर्ण कर्जमाफी, कर्जमुक्ती करून दाखवले, यासारखे सरकारचे निर्णय दररोज कानी पडतात. परंतु, शेतकऱ्यांच्या पदरी काय, असा सवाल आजही कायम आहे.