लातूर - महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पाची सुरुवातच शेतकऱ्यांच्या मुद्द्याने झाली. यामध्ये झालेली कर्जमाफी आणि उर्वरित शेतकऱ्यांना दिलासादायक योजना देण्याचे मुद्दे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडले. मात्र, हमीभाव आणि पिकांचे घसरलेले दर यावरून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्प होत असतानाच शेतकऱ्यांच्या मनातील भावना आमचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे यांनी जाणून घेतल्या आहेत.
महात्मा फुले कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांची २ लाखापर्यंतचे कर्जमाफ झाले आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांकडे २ लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, त्या शेतकऱ्यांचेही २ लाख सरकारच भरणार आहे. कर्ज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रहोत्सनापर देण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. या जमेच्या बाजू असल्या तरी हमीभावावरून शेतकऱ्यांचे होत असलेल्या नुकसानीचा पाढाच शेतकऱ्यांनी वाचला आहे. कर्जमाफी या एकाच मुद्द्यांभोवती अर्थसंकल्प होता. मात्र, पिकाला हमीभाव नाही. एवढेच नाही तर सरकारने ठरवून दिलेला हमीभावही सध्या सोयाबीनला मिळत नाही. ४ हजार ८०० रुपये हा हमीभाव असला तरी ३ हजार ५०० रुपयांनी सोयाबीन विक्री करावी लागत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सौरऊर्जा पंप आणि दिवसा वीज यासारख्या घोषणा आतापर्यंत हवेतच विरल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी हा मुद्दा वगळता इतर बाबतीत शेतकऱ्यांची निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे कही खुशी कही गम असाच असल्याचा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे हे नक्की.