लातूर -मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यावरील संकटाची मालिका यंदाही सुरूच आहे. खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. याच अवकाळी पावसाचा परिणाम आता रब्बी हंगामावरही झाला आहे. रब्बी हंगामातील पेरण्या महिनाभराच्या फरकाने लांबल्या आहेत. याचा रब्बी पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
खरीपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन रब्बीची पेरणी केली. मात्र, पेरणीला उशीर झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला आहे. मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने किडीचा प्रादुर्भावही जाणवू लागला आहे.