लातूर - प्रतवारीनुसार शेती मालाची खरेदी न करता काही निवडक खरेदीदार मालाचा सौदा करीत आहेत. त्यामुळे उत्तम दर्जाचा शेतीमाल असतानाही प्रतिक्विंटल 300 ते 400 रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पोटलीच्या नावाखाली शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी आणि लिलाव पुकारूनच खरेदी- विक्रीचा व्यवहार करण्याच्या मागणीसाठी आज (सोमवारी) शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठवाड्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथूनही शेतीमालाची आवाक होते. राज्यातील इतर बाजार समितीमध्ये आडतीच्या मालाचा खरेदी समोर सौदा पुकारला जातो. खरेदीदार मालाच्या प्रतवारीनुसार खरेदी करतो. मात्र, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काही आडते हेच सौदा काढतात. उत्तम दर्जचा शेती माल असला तरी 300 ते 400 रुपयांनी कमी भावाने खरेदी केला जात आहे. काटा, वजन यासारखी कारणे सांगून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. पोटलीच्या नावाखाली बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट सुरू असून याला प्रशासनाचे पाठबळ आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. त्यामुळे प्रतवारीनुसार सौदे व्हावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.