लातूर- कांदा निर्यातबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध सर्वत्र होत आहे. लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्यावतीने निर्यातबंदी निर्णयाच्या आदेशाची होळी करण्यात आली तर कांद्याची रांगोळी काढून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून आंदोलन करण्यात आले.
कांद्यावर निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्यांचे दर घसरले असून शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर याचा परिणाम होऊ लागला आहे. आसमानी संकटाबरोबरच शेतकऱ्यांना आता सुलतानी संकटाला देखील सामोरे जावे लागत आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे 25 टक्के पेक्षा अधिकच्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करण्याची औपचारिकता न बाळगता थेट हेक्टरी 50 हजारांची मदत करावी शिवाय खरिपातील सर्वच पिकांना 100 टक्के विमा मंजूर करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.