लातूर -दिवसभर शेतकरी परवाना पावत्या घेऊन दुकानदाकडे बियाणे मागत आहेत, परंतु अनुदानावरील बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकर्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. बियाणे उपलब्ध नसतानाही परवाने देऊन कृषी विभाग शेतकर्यांची चेष्टा करीत असल्याचा प्रकार शहर व जिल्ह्यात समोर येत आहे.
परवाना असूनही बियाणे वाटप होईना हेही वाचा - औरंगाबादमध्ये अनाथ गौरीच्या विवाहासाठी राजकारण्यांसह अभिनेत्यांची हजेरी
शासनाने रब्बी हंगामातील अनुदानावर हरभरा बियाणे वाटपाची जबाबदारी महाबीज कंपनीकडे सोपवली असून त्यासाठी लागणारा परवाना कृषी विभागाकडून वाटप होत आहे. शासनाकडून उपलब्ध बियाणांच्या प्रमाणात त्याचा परवाना कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मागच्या आठ दिवसापासून सुरळीतपणे वाटप करण्यात आले. जाॉकी 9218 जातीचे 274 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना बुधवार (दि 13) रोजी दिवसभर वाटप करण्यात आले.
महाबीज कंपनीने बियाणे वाटपासाठी गणेश कृषी सेवा केंद्र निलंगा, व्यंकटेश कृषी सेवा कासारशिरसी, रविराज अॅग्रो कासार शिरसी, चिंचनसुरे फर्टिलायझर कासारशिरसी, माऊली कृषी सेवा कासारशिरसी, दिलीप फर्टिलायझर निटूर, तालुका खरेदी विक्री संघ निलंगा, गोविंद ट्रेडिंग कंपनी निलंगा, संभाजी कृषी सेवा निलंगा, पंकज फर्टिलायझर निटूर, रामलिंगेश्वर फर्टिलायझर निलंगा यांना बियाणे उपलब्ध करून दिले.
14 नोव्हेंबरला शेतकरी परवाना घेऊन बियाणासाठी दुकानदारांकडे खेटे मारुनही बियाणे उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात येत होते. शेतकरी पुन्हा कृषी विभागाचा रस्ता तुडवत बियाणे मिळविण्यासाठी फेऱ्या मारताना दिसत होता. अनेक शेतकऱ्यांनी तर कंटाळून कृषी कार्यालयाच्या परिसरात बसले आहेत. औराद शहाजनी येथील शेतकऱ्यांनी तर चक्क बियाणे मिळविण्यासाठी निटूर येथे जावे लागले. बियाणे वाटपाची संपूर्ण जबाबदार महाबीज कंपनीची असताना महाबीज व दुकानदार मिळून शेतकऱ्यांची फसवणूक आणि आडवणूक करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परवाना घेऊन गेले की बियाणे उपलब्ध नाहीत असे सांगण्यात येत होते. तर बेकायदेशी सर्रास विक्री होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शासनाच्या वतीने 274 क्विंटल बियाणाचे परवाने शेतकऱ्यांना दिलेले आहे.
कृषी विभागात चौकशी केली असता जेवढे परवाने प्राप्त झाले आहेत. तेवढे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले असून तेवढेच बियाणे महाबीजकडून संबधित दुकानारांना देण्यात आले असल्याचे सांगितले. या विषयी महाबीज कंपनीचे अधिकारी शिंदे यांना भ्रमणध्वनी संपर्क साधला असता, त्यांनी फोन स्वीकारला नाही.
हेही वाचा - शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी - उद्धव ठाकरे