लातूर -लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा रक्कम आणि पेन्शनसारखे मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कर्जमाफी फसवी असल्याचे विरोधकांनी पटवून दिले, तर सत्ताधाऱ्यांनी आपल्या यशाचा धिंडोरा पिटला. मात्र, मोदी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, हो हे खरे आहे. लातुरतील गुरुलिंग मोदी गेल्या २० वर्षांपासून कर्जमाफीची प्रतिक्षा करत आहेत.
गुरुलिंग मोदी यांचे मूळ गाव लातूर तालुक्यातील भिसे वाघोली हे आहे. त्यांच्याकडे साडेचार एकर कोरडवाहू शेती आहे. २० वर्षांपूर्वी त्यांनी विहीर खोदण्यासाठी आणि पाईपलाईन करण्यासाठी एसबीआय व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मिळून २ लाखांचे कर्ज काढले होते. कर्ज काढून आता २० वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, त्यांना ना आघाडीच्या काळात ना युतीच्या काळात कर्जमाफी मिळाली नाही. याउलट वेळेत कर्जाची परतफेड केली नसल्याने बँकेने त्यांना न्यायालयात खेचले आहे. त्यामुळे गुरुलिंग मोदी यांना आता बँकेबरोबरच न्यायालयाचीही पायरी चढावी लागत आहे.