लातूर - पावसाच्या समाधानकारक हजेरीनंतर खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. पण, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध करत तंत्रज्ञान स्वातंत्र्य हंगाम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सरकारने बंदी घातलेल्या जनुकीय सुधारित बियाणांची लागवड केली आहे. यामध्ये कापूस, मका, भात, मोहरी, सोयाबीन, वांगी याचा समावेश असून या बियाणामुळे उत्पादन वाढत असेल तर परवानगी का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांना आवडीनुसार कोणतेही बियाणे किंवा तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य देण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या करण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयाला विरोध करत दोन वर्षांपासून एचटीबीटी कपाशीची जाहीर लागवड करण्यात आली होती. शिवाय जनुकीय सुधारित बियांणांवरील बंदी उठवण्याची मागणी करण्यात आली होती. याकडे दुर्लक्ष होत असल्याने चालू हंगामातही या सुधारित बियाणांची लागवड केली जात असल्याचे शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी सांगितले आहे.