लातूर - शेताकडे जाण्याचे मार्ग सुकर होण्यासाठी भाजपा सरकारने मागील पाच वर्षांत पाणंद रस्ते योजनेची सुरुवात केली. यानंतर शेताकडे जाणारे अरुंद रस्ते विस्तारण्यात आले. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना तयार केली. सध्या यामार्फत देखील कामे सुरू आहेत. परंतु झरी येथील अण्णाराव बिराजदार हे शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून शेताकडे जाण्यासाठी शासनाला रस्ता मागतोय. त्याची कोणीही दखल घेत नसल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
मागील पाच वर्षांत निलंगा तालुक्यातील झरी येथील शेतकरी अण्णाराव बिराजदार यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदारांचे उंबरठे झिजवले. तसेच सर्व अधिकाऱ्यांंना लेखी निवेदन देऊन रस्त्यासाठी मागणी देखील केली. परंतु, आजपर्यंत याची दखल कोणीही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. बिराजदार यांनी तुरीचे पीक व सोयाबिनचे उत्पन्न घेतले आहे. यासाठी त्यांना रानावर जावे लागते. बिराजदार यांना ६३ गुंठे जमीन आहे. यावरच त्यांचा उदर्निर्वाह चालतो.