लातूर- अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून, पीकपद्धतीमध्ये बदल करून उत्पादन वाढवण्याचा तरुण शेतकऱ्यांचा मानस आहे. त्याप्रमाणेच मुगावच्या तरुणाने पदवीचे शिक्षण घेऊन भाजीपाल्याची लागवड केली. मात्र, कोरोनाचे विघ्न असे काय घोंगावलेय की हरिश्चंद्र जाधव याने गवत नष्ट करायच्या औषधाने चक्क टोमॅटोचा प्लॉटच नष्ट केलाय आणि बाजारपेठ बंद असल्याने शिमला मिरचीचेही नुकसान होऊ लागले आहे.
कोरोना साईड इफेक्ट: तणनाशक फवारून टोमॅटो केले नष्ट, तर मिरची झाडावरच झाली पिवळी
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून, पीकपद्धतीमध्ये बदल करून उत्पादन वाढवण्याचा तरुण शेतकऱ्यांचा मानस आहे. त्याप्रमाणेच मुगावच्या तरुणाने पदवीचे शिक्षण घेऊन भाजीपाल्याची लागवड केली.
पारंपरिक पीक घेऊन उत्पादन वाढत नसल्याने मुगाव येथील तरूण शेतकरी हरिश्चंद्र राजकुमार जाधव याने दोन एक्करात टोमॅटो आणि तीन एक्करात शिमला मिरचीची लागवड केली होती. निसर्गाशी दोन हात करीत त्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे टोमॅटो आणि मिरची याची जोपासना केली. परंतु ऐन पैसे पदरात पडण्याच्या प्रसंगी कोरोनाचे संकट आले आणि सर्वकाही होत्याचे नव्हते झाले आहे. एकतर टोमॅटोचे दर घसरलेत आणि बाजारपेठही बंद आहेत. त्यामुळे दोन एक्करातील टोमॅटोवर हरिश्चंद्र यांनी चक्क तृणनाशक फवारले आहे. त्यामुळे टोमॅटो जागेवरच करपून गेले आहेत. आता शिमला मिरचीबाबत जाधव आशादायी आहेत. पण सध्याच्या संचारबंदीमुळे वाहतूकच बंद आहे. त्यामुळे मिरची झाडालाच पिवळी पडू लागल्याने जाधव यांच्या चिंतेत भर पडली आहे.
एकवेळ सोयाबीन, ज्वारी, हरभरा हे साठवून ठेवता येईल, पण या भाजीपाल्याचे काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. हरिश्चंद्र राजकुमार जाधव या तरूण शेतकर्याने जानेवारीमध्ये मलचिंग पेपरच्या साह्याने ठिबक सिंचनाव्दारे तीन एक्कर सिमला मिरची व दोन एक्कर टोमॅटोची लागवड केली. लागवडीपासून ते फवारणी व इतर खर्च मिळून आजतागायत साधारणपणे दोन लाख रूपयांपेक्षा जास्त खर्च जाधव यांना आला. मात्र, आता कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बाजारबंद आहे. त्यामुळे दोन्ही पिके पूर्णत: हातून गेली आहेत.