लातूर -जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सर्व काही हिसकावून घेतले आहे. या नुकसानानंतर जिल्ह्यात आमदार, खासदार यांची पीक पाहणीसाठी रीघ लागली आहे. पावसाने खरिपाच मोठे नुकसान झाले आहे. आभाळ फाटल्यागत पाऊस झाला असून शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आता सरकारनेच मदतीचा हात देऊन या संकटातून बाहेर काढण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
पावसाने शेतच केले गायब! निलंग्याच्या सोनखेड परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा
राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे. अगोदरच कोरोनामुळे त्रस्त असलेला शेतकरी पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यात तर काही ठिकाणी अक्षरश: शेतजमिनीदेखील वाहून गेल्या आहेत.
पावसामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, निलंगाच्या सोनखेड परिसरातील कोल्हापुरी बंधाऱ्यात अतिरिक्त पाणी आला व बंधाऱ्याने प्रवाह बदलला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीनी पूर्णपणे वाहून गेल्या आहेत. शासनाने आता पंचनाम्यांची औपचारिकता न ठेवता थेट मदतीची घोषणा करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
लातूर जिल्ह्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान निलंगा तालुक्यात झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील पीके नष्ट झाली आहेत. काही ठिकाणी शेतांचे तळ्यात रुपांतर झाल्याने रब्बी हंगामातही उत्पादन घेता येईल की नाही, अशी अवस्था आहे. आता मंत्री गावात येणार म्हटल्यावर शेतकरी मदतीच्या अपेक्षेने त्यांची वाट पाहत आहेत.