लातूर -कांद्याच्या वाढत्या दराचा बाऊ होत असला, तरी इतर भाजीपाला कवडीमोल दरात विकला जात आहे. कांद्यामुळे काही मोजक्या शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. मात्र, इतर भाजीपाल्याला योग्य दर मिळत नसल्याने तो रस्त्यावर फेकण्याची आणि जनावरांना खाऊ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले. मागणी आणि आवक यांचे समीकरण न जुळल्याने कांद्याला भरघोस भाव मिळत आहे. मात्र, लातूरच्या बाजारात सोमवारी लिंबू 5 रुपये किलो, टोमॅटो 8 रुपये किलो, तर मेथी थेट जनावरांपुढे, अशी परिस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे कांदा सोडला, तर इतर भाजीपाला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.