लातूर - गाव स्थरावर महत्त्वाची मानली जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याकरिता 23 ते 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन सादर करता येणार आहेत. 31 डिसेंबररोजी अर्जांची छाननी केली जाणार असून 4 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. तर याच दिवशी निवडणूक चिन्हही दिले जाणार आहे.
कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील पहिलीच निवडणूक
जिल्ह्यात एकूण 785 ग्रामपंचायती आहेत. यापैकी 408 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात ही पहिलीच निवडणूक असून योग्य ती खबरदारी घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी स्पष्ट केले आहे. 408 ग्रामपंचायतीमधून 3 हजार 548 उमेदवार हे निवडून दिले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर केले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.
1 हजार 432 केंद्रावर पार पडणार निवडणूक प्रक्रिया
जिल्ह्यातील 408 ग्रामपंचायतीसाठी 6 लाख 72 हजार मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. 1 हजार 432 केंद्रांवर ही निवडणूक पार पाडली जाणार असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासन आता निवडणुकीच्या तयारीला लागले असून नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पदभार घेतल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक पार पडत आहे.