महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भूकंप पुनर्वसनात मिळालेल्या घरावर महिलेचा कब्जा, बेघर झालेल्या कुटुंबावर आली 'ही' वेळ...

जिल्ह्यात १९९३ किल्लारीत झालेल्या महाकाय भूकंपातील पिडीतांना शासनाने पुनर्वसन करून घरे बांधून दिली. यातीलच निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड येथील अजय मस्के यांच्या घराचे कब्जा प्रमाणपञ व मंडळाधिकारी यांची ताबा पावती असताना देखील गावातील एका महिलेने सदर व्यक्तीच्या घरावर कब्जा केला. त्यामुळे सध्या मस्के एका टमटममध्ये राहून संसार करत आहेत.

बेघर झालेल्या कुटुंबाने टमटममध्ये मांडला संसार
बेघर झालेल्या कुटुंबाने टमटममध्ये मांडला संसार

By

Published : Sep 1, 2020, 4:56 PM IST

लातूर :भूकंप पुनर्वसनामध्ये निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड येथील अजय विनायक मस्के यांच्या घराचे कब्जा प्रमाणपञ व मंडळाधिकारी यांची ताबा पावती असताना देखील गावातील एका महिलेने सदर व्यक्तीच्या घरावर कब्जा केला. त्यामुळे सध्या मस्के एका टमटममध्ये राहून संसार करत आहेत.

जिल्ह्यात १९९३ ला महाकाय भूकंप झाला व किल्लारीसह परिसरातील अनेक अनेक गावे उध्वस्त झाली होती. अनेक घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड होऊन अनेकांना आपला जीव यात गमवावा लागला होता. शासनाने भूकंपामध्ये ज्यांची घरे पडली त्यांचे पुनर्वसन करून घरे बांधून दिली. मात्र, अनेकजन पुनर्वसनात घरे मिळाल्यावर देखील दुसऱ्यांच्या घरावर ताबा घेऊन बेघर करत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे दिल्या आहेत. परंतु, त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे तालुक्यातील एकोजी मुदगड येथील रहिवासी अजय मस्के यांना जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी घर क्रमांक २६१/अ चा ताबा ३० ऑक्टोबर २०१८ रोजी मंडळाधिकारी यांनी समक्ष पंचनामा करून दिला. सदर घराच्या मालकी हक्काचे प्रमाणपञ दिनांक २४ जानेवार २०१९ रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार विक्रम देशमुख निलंगा यांनी दिले आहेत. परंतु, गावातीलच सुरेखा नागनाथ मस्के यांच्या पतीच्या नावे घर असूनदेखील त्या महिलेने या हक्काच्या घरावर कब्जा घेऊन बेघर केले आहे. असे प्रकार घडत असतानाही शासन याची दखल घेत नाही.

भूकंप पुनर्वसनात मिळालेल्या घरावर महिलेचा कब्जा

घराशी संबंधीत सर्व जूनी कागदपत्रे अजय मस्के यांचे वडील विनायक रंगराव मक्के यांच्या नावे आहेत. त्यांच्या माघारी वारस म्हणून अजय मस्के याला रितसर शासन नियमाप्रमाणे भूकंप पुनर्वसनाचे घर मिळाले आहे. गेल्या तीन महिण्यांपासून सदर अन्यायग्रस्त व्यक्ती निलंगा तहसीलच्या चकरा मारत आहे. परंतु तहसीलदार गणेश जाधव दखल घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, तुम्ही न्यायालयात जाऊन न्याय मागा मी या प्रकरणात काहीच करू शकत नाही. तुमचा आपसी मामला आहे, असे तहसीलदार म्हणाल्याचा आरोप अजय मस्के यांनी केला आहे.

एकोजी मुदगड येथील भूकंप पुनर्वसनमध्ये बांधलेल्या घरामध्ये १२ लोकांनी आतिक्रमण केले होते. त्या सगळ्यांना शासनाने २४ ऑक्टोबर २०१७ रोजी अतिक्रमण काढा व घरे खाली करा, अशी नोटीस काढली होती. त्या १२ अतिक्रमण केलेल्या लोकांमध्ये सदर विधवा महिलेचा पती नागनाथ पंडू मस्के याचे नाव आहे. तरीदेखील शासनाच्या नोटीसला न जुमानता हि महिला अतिक्रमण करून कब्जा मिळवून अजय मस्के यांच्या घरात रहात आहे. त्यामुळे या बेघर झालेल्या व्यक्तीला आपल्या कुटुंबासह टमटममध्ये राहावे लागत आहे. वृद्ध आई, पत्नी, दोन लहान मुले घेऊन ते गेल्या पाच सहा महिण्यांपासून टमटममध्येच राहत आहेत. हक्काचे घर असूनदेखील बेघर झालेल्या मस्के परिवाराला शासनाचे अधिकारी लोक प्रतिनिधी तरी न्याय देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सदर अतिक्रमण केलेल्या महिलेने खोटे पुरावे जोडून शासनानेकडे अनेक अर्ज केले आहेत. यावर प्रत्यक्ष शासनाच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन चौकशी केली. माञ, या महिलेकडे शासन नियमाप्रमाणे २६१ घर नंबरचे कोणतेच पुरावे नाहीत. शासकीय अधिकारी हतबल होऊन गेले, तरीदेखील या अतिक्रमण केलेल्या महिलेने घराचा ताबा सोडला नाही. उपजिल्हाअधिकारी पुनर्वसन लातूर यांनी दिनांक १६ जून २०२० रोजी सदर अतिक्रमण काढून अजय मस्के यांना कब्जा द्या, असे आदेश उपविभागीय अधिकारी व तहसीलदार निलंगा यांना काढला आहेत. तरीदेखील तहसीलदार याकडे दुर्लक्ष करत आहेत व मला न्याय देत नाहीत. 'साहेब! माझे हक्काचे घर मला द्या' अशी मागणी करताच तो आमचा विषय नाही. कोर्टात जा व न्याय माग, असे ते बोलतात. मी जगावे का मरावे हा मोठा प्रश्न माझ्या कुटुंबियासमोर आहे, असे मस्के म्हणाले. यासोबतच, तत्काळ न्याय नाही मिळाला तर संपूर्ण कुटुंबीयासह तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही बेघर झालेल्या अजय मस्के यांनी यावेळी दिला.

हेही वाचा -मागण्या मान्य करा अन्यथा परिणामांना सामोरे जा; परिचारिकांचा सरकारला इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details