लातूर- जिल्ह्यात पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण आणि साचलेल्या दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. ताप, सर्दी, खोकला याशिवाय दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो यासारखे साथीचे आजार वाढले आहेत. लातूर शासकीय रुग्णालयाची ओपीडी आठशेवरून थेट बाराशेवर गेली आहे. त्यामुळे 24 तास रुग्णांची सेवा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्वाईन फ्लूचा कक्षही उभारण्यात आला आहे.
जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी एक जिल्हा शासकीय रुग्णालय आणि 10 ग्रामीण रुग्णालये आहेत. साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील शासकीय रुग्णालयात दिवसाकाठी सातशे ते आठशे रुग्ण तपासणीसाठी येतात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा बाराशेवर येऊन ठेपला आहे.