लातूर- लातूरमधील दुष्काळाच्या दाहकतेचा चटके येथील बळीराजा सहन करीत आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी आलेले नेतेमंडळी मात्र आपल्या सोईनुसार दुष्काळाचा बाऊ करत आहेत. गेल्या आठवड्यात 'आदित्य संवाद'मधून ठाकरे युवराजांनी चाढ्यावर मूठ ठेवत स्टंटबाजी केली. तर आज खुद्द कृषिमंत्री अनिल बोंडे यांनाही पेरणी करण्याचा मोह आवरला नाही.
नेतेमंडळी 'स्टंटबाजी'त व्यस्त पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असतानाही कृषीमंत्री वावरात आलेतं म्हणल्यावर काही मिनिटांसाठी का होईना, पेरणीचा हा दिखावापणा तर करावाच लागेल ना, त्यानंतर कृषी मंत्र्यांनी बांध ओलांडताच तिफणही सोडण्यात आली, अशा प्रकारे शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी आलेले मंत्री आणि नेतेमंडळी फक्त दिखाऊपणा करत असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. खरीपचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही 30 टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत, असे असताना दुष्काळ पाहण्यासाठी मंत्र्यांची गर्दी होत आहे. मंगळवारी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनीही नाळेगाव येथे चाढ्यावर मूठ ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोटोसाठीचा गराडा आणि अनिल बोंडे यांचा पेरणी करण्याचा प्रकार बहुतेक बैलांनाही रुचला नसावा आणि बैल सैरावैरा करू लागले. या दरम्यान, आमदार विनायक पाटील यांनी कासरा आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ही फसला आणि पेरणी अर्ध्यावर सोडून कृषीमंत्र्यांना बांधाबाहेर यावं लागले. एवढेच नाहीतर मंत्रीगण बाहेर येताच संबंधित शेतकऱ्यानेही तिफन सोडून दिली. त्यामुळे ही पेरणीही केवळ 'स्टंटबाजी' असल्याचे स्पष्ट झाले.
निवडणुकांच्या तोंडवर अशी स्टंटबाजी करणे अपेक्षित असले, तरी शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम या नेतेमंडळीकडून होत आहे, हे मात्र नक्की. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मंत्र्यानी वास्तवाचा अभ्यास करून मदत करावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, नेतेमंडळींना स्टंटबाजीतून वेळ मिळेल तेव्हाच खरे.