लातूर - हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. दोन महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने सरासरी क्षेत्राच्या केवळ ५० टक्क्यावरच पेरा झाला आहे. पेरणीक्षेत्रातील पिकांची उगवण झाली खरी मात्र, पावसाने उघडीप दिल्याने उगवलेली पिकेही आता माना टाकू लागली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
लातुरवर यंदाही दुष्काळाचे सावट; उगवलेल्या पिकांनीही टाकल्या माना - drought
दोन महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने सरासरी क्षेत्राच्या केवळ ५० टक्यावरच पेरा झाला आहे. पेरणीक्षेत्रातील पिकांची उगवण झाली खरी मात्र, पावसाने उघडीप दिल्याने उगवलेली पिकेही आता माना टाकू लागली आहेत.
पावसाची सरासरी ८०२ मिमी असताना आतापर्यंत केवळ १५७ मिमी म्हणजे सरासरीच्या ५७ टक्केच पाऊस जिल्ह्यात झाला आहे. अत्यल्प पावसवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असल्या तरी सद्यस्थितीला पिके सुकू लागली आहेत. शिवाय भर पावसाळ्यात उपलब्ध पाणीसाठ्यावर पिकांची जोपासणा करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. सोयाबीन हे खरीपातील प्रमुख पिक असून १ लाख ८६ हजार हेक्टरावर पेरा झाला आहे. उर्वरीत ५० टक्के क्षेत्रावरील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची अपेक्षा आहे. मात्र, खरीपाचा कालावधी हातचा जात असल्याने आता पाऊस होऊनही पेरणी होईल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
गेल्या चार दिवसापासून तर जिल्ह्यात पावसाचा थेंबही बरसलेला नाही. त्यामुळे खरीपाची आशा धुसर झाली असून बळीराजा चिंतेत आहे. तर दुसरीकडे पावसासाठीची भटकंती कायम आहे.औसा शहरातील नागरिकांना आजही विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते हे वास्तव आहे.