लातूर -लातूरच्या एमआयटी मेडीकल कॉलेजचा कोरोनाबाधित विद्यार्थी डॉ. राहुल पवारचा औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालायात उपचार सुरू असताना आज अखेर मृत्यू झाला आहे. राहुल पवार याचे वय अवघे 25 वर्ष होते. तो 'एमबीबीएस'च्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. राहुलला कोरोनाची लागण झाल्याने गेल्या 20 ते 25 दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
राहुल पवारचा जन्म परभणी जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्याचे आईवडील ऊसतोड मजुर आहेत. परिस्थितीशी दोन हात करत त्याने शिक्षण घेतले, गावातून तो पहिलाच डॉक्टर बनणार होता. मात्र एप्रिल महिन्यात परीक्षेच्या घाईगडबडीत त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोनाचे उपचार सुरू असताना त्याला म्युकरमायकोसीसची देखील लागन झाली. आजार अधिक बळावत गेल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.
'ई-टीव्ही भारत'ने दि.18 मे, 2020 रोजी 'ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉ. राहुल पवारची मृत्यूशी झुंज सुरूच' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. सोबतच त्याच्या उपचारासाठी मदतीचे देखील आवाहन केले होते. बातमीचा 'इम्पॅक्ट' म्हणून दोन दिवसांत तब्बल 2 लाख 76 हजार रुपयांची आर्थिक मदत थेट राहुलच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा देखील झाली होती. शिवाय राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी 'ई-टीव्ही भारत'च्या बातमीची दखल घेत राहुल पवारच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य शासन करणार असल्याचे सांगितले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज राहुलचा मृत्यू झाला.