लातूर - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जनतेने भरभरून मते दिली आहेत. राज्यात 40 लाख मतदान आणि एक उमेदवार दिल्लीत गेला आहे. निवडणूक केंद्राची असली तरी खरा उद्देश हा आगामी काळात असणाऱ्या विधानसभेसाठीचाच होता. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत वंचितची योग्य पायाभरणी झाली असून याचे परिणामही येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगलेच होतील, असा विश्वास अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणूकीसबंधी माहिती दिली लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर ते प्रथमच लातूर दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली. काँग्रेस- राष्ट्रवादीमधील गळती कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार हे वंचितच्या संपर्कात आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मात्र, लोकसभेत ज्या ठिकाणी उमेदवार नाहीत व जिथे एका उमेदवाराचा 3 पेक्षा अधिक वेळेस पराभूत झाला आहे. अशा जागांची मागणी वंचितने काँग्रेसकडे केली होती. केवळ ही गोष्ट त्यांनी मान्य न केल्याने काँग्रेसचे पानिपत झाल्याचा आरोपही यावेळी आंबेडकर यांनी केला. लोकसभा निवडणुकीत मतदान समाधानकारक झाले असले तरी माझा पराभव कशामुळे झाला याचे स्पष्टीकरण व लातूर येथेही मतदान प्रक्रियेतील घोळबाबत तक्रारीचा उहापोह 7 जून रोजी करणार आहे. काँग्रेसची वोट बँक दिवसेंदिवस घटत असून केवळ मुस्लिम मतदारच त्यांच्या बाजूने आहे. मराठा आणि इतर सर्व समाज भाजपकडे वळला असून त्याचा फटका त्यांना बसत आहेत.लोकसभा निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला भाजपाची 'बी' टीम म्हणून आरोप केला जात होता परंतु जनतेने दिलेला कौल हा सर्व काही सांगून जातो, असेही आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीच्या सध्या विधानसभेच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत.