लातूर -येथील स्व.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्थेच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. डॉ. अमित नंदलाल वर्मा असे या निवासी डॉक्टरांचे नाव आहे.
शहरातील गांधी चौकात स्व.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्थेचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय आहे. काल रात्री नागनाथ काशीनाथ निलंगेकर (वय 60 वर्ष) यांचे कोरोनाने निधन झाले. यावेळी निवासी डॉ. अमित वर्मा कर्तव्यावर होते. निधनाची माहिती कळताच मृत नागनाथ निलंगेकर यांचे चिरंजीव अमोल निलंगेकर यांचे चार मित्र रुग्णालयातील कोविड वार्डात आले. कर्तव्यावर असलेल्या डॉ. अमित वर्मा यांच्याशी वाद घालत, त्यांनी डॉक्टरांना धक्काबुक्की केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गांधी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ एका आरोपीला अटकही केले. परंतु उपस्थित डॉक्टर आक्रमक झाले. त्यांनी अन्य तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. हा सर्व प्रकार काल मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. त्यानंतर अन्य तीन आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहरातील गांधी चौक पोलीसांनी शुभम दिलीप नाकाडे (रा.व्यंकटेश नगर, लातूर), श्रीनिवास गोविंदराव घोबे (रा.अंबाजोगाई रोड, लातूर), आकाश प्रमोद शेटे (रा.निफाड, नाशिक), नामदेव हणमंत शिंदे (रा.व्यंकटेश नगर, लातूर) यांच्यावर गुर.नं.322/2021 कलम-353,332,504.34 भादवि व महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम कलम-5 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.