लातूर- स्थानिक पातळीवर महिलांचे बचतगट स्थापन करून त्यांचे सक्षमीकरण करण्याची भूमिका 'उमेद'चे कर्मचारी पार पाडत आहेत. राज्य कक्षामार्फत देण्यात आलेले उद्दिष्ट या कर्मचाऱ्यांमार्फत पूर्णही करण्यात आले आहे. असे असताना 10 सप्टेंबर रोजी या कंत्राटी कर्मचाऱ्यांची पुर्ननियुक्ती प्रक्रिया थांबविण्याचे पत्र सरकारने दिले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने सरकारच्या या निर्णयाचा विरोध करीत शुक्रवारी लातूर जिल्हा परिषद येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे सरकारची धोरणे स्थानिक पातळीवर रुजलेली आहेत. त्यामुळेच महिला बचतगटाचे जाळे निर्माण झाले असून अनेकांच्या हाताला कामही मिळाले. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांमुळे हे शक्य झाले त्यांच्याच नोकरीवर आज गदा आली आहे. 10 सप्टेंबर रोजी या कंत्राटी कर्मचाऱ्यांची पुर्ननियुक्ती करू नये, अशा प्रकारचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो कंत्राटी कर्मचारी हतबल झाले आहेत.