लातूर - येथील स्व. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान व संशोधन संस्थेत 'बेरा' मशीनसह कर्णदोष तज्ञ नियुक्त झाल्याने रुग्णांना आधार मिळाला आहे. तरी वाचादोष तज्ञ (स्पीच थेरपीस्ट) अद्याप उपलब्ध नसल्याने रुग्णांना मुंबईला पाठवण्याची वेळ येथील रुग्णालय प्रशासनावर आली आहे. त्याचा नाहक त्रास रुग्णांसह नातेवाईकांना सहन करावा लागत आहे.
लातूर शासकीय रुग्णालयात मुकबधीरांची परवड 2019 मध्ये कर्णदोष तज्ञाची नियुक्ती -
लातूरच्या स्व.विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात दोन वर्षापुर्वी 'ऑडिओलॉजिस्ट' अर्थात 'कर्णदोष तज्ञ' हे पद मंजूर नव्हते. त्यामुळे कर्णदोष असलेल्या रुग्णांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुंबईला अनेकवेळा जावे लागत असे. यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना वेळ, पैसा खर्चूनही नाहक त्रास सहन करावा लागत होता. येथील रुग्णालय प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन 'वाचादोष तज्ञ' हे पद मंजूर करुन घेतले. त्यानंतर या पदावर जून, 2019 मध्ये कर्णदोष तज्ञाची नियुक्ती करण्यात आली.
700 कर्णदोष रुग्णांची तपासणी दिले प्रमाणपत्र -
कर्णदोष तपासण्यासाठी रुग्णाच्या दोन तपासण्या केल्या जातात. यातील 'प्युअर ऑडीओमेट्री' ही तपासणी येथील रुग्णालयात उपलब्ध होती. परंतु 'बेरा' या तपासणीसाठी रुग्णांना मुंबईला जावे लागत होते. 'बेरा' तपासणीमध्ये रुग्णांच्या मेंदूच्या हालचाली समजतात. यात रुग्णाला कितपत ऐकायला येते हे मशिनद्वारे समजते. त्यामुळे रुग्णाचा कर्णदोष खरा किंवा खोटा हे पण तात्काळ समजते. शिवाय कर्णदोषाची टक्केवारी, क्षमताही समजते. त्यामुळे रुग्णाच्या आजाराचे तात्काळ निदान करणे तज्ञाला सोयीस्कर होते. येथील कर्णदोष तज्ञाच्या नियुक्तीनंतर आजतागायत जवळपास 700-800 कर्णदोष रुग्णांची तपासणी लातूरच्या शासकीय रुग्णालयात करुन त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे येथील कर्णदोष तज्ञ सचिन कुंभार यांनी सांगितले आहे.
नाईलाजाने मुंबईची करावीच वारी -
येथील शासकीय रुग्णालयातील कर्णदोष रुग्णांची होणारी गैरसोय थांबली असली तरी वाचादोष रुग्णांची होणारी हेळसांड अद्याप कायम आहे. येथील शासकीय रुग्णालयात कान, नाक, घसा या विभागात 'कर्णदोष' व 'वाचादोष' रुग्णांची तपासणी केली जाते. शिवाय या दोन आजारांच्या रुग्णांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र याच विभागाकडून प्राप्त करावे लागते. परंतु या विभागात वाचादोष तज्ञ अर्थात 'स्पीच थेरपीस्ट' हे पद मंजूर नसल्याने त्यासाठी रुग्णांना मुंबईला पाठवण्यात येत आहे. त्यासाठी रुग्णासह नातेवाईकांना वेळ व पैसा खर्चून अनेकवेळा मुंबईचे हेलपाटे मारावे लागत आहेत. मुंबईच्या रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय येथील रुग्णालयाकडून वाचादोष अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही. यासाठी नाईलाजाने अनेक रुग्ण व नातेवाईकांना अर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नसले तरी मुंबईची वारी करावीच लागत आहे. याचा नाहक त्रास रुग्णांसह नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. येथील शासकीय रुग्णालयात वाचादोष तज्ञाचे पद मंजूर व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. विनोद कंदाकुरे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
स्पीच थेरपीस्टचे पद मंजूर करावे -
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हेच लातूरचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या प्रयत्नानेच येथील शासकीय रुग्णालयाचे नामकरण 'स्व. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान व संशोधन संस्था' असे झाले आहे. रुग्णांना दर्जेदार सोईसुविधा मिळाव्यात, रुग्णांची परवड होवू नये यासाठी मंत्री देशमुख यांच्या सुचनेनुसार विविध समित्याही नुकत्याच गठीत करण्यात आल्या आहेत. येथील रुग्णालयात स्पीच थेरपीस्ट हे पद मंजूर करुन पदभरती करण्यात यावी, अशी मागणी येथील रुग्णालय प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हेच लातूरचे पालकमंत्री असल्याने येथील शासकीय रुग्णालयात तात्काळ सुविधा उपलब्ध करुन देत रुग्णांची होणारी परवड थांबवावी, अशी अपेक्षा येथील रुग्णांसह नागरिकांतून व्यक्त होत आहे.