लातूर- अवेळी झालेल्या पावसाचा परिणाम आता थेट बाजारभावावर दिसून येऊ लागला आहे. खरिपातील प्रमुख असलेल्या सोयाबीनची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे. मात्र, गतवर्षी पेक्षा यंदाची आवक घटली असून पावसामुळे निकृष्ठ दर्जाचे सोयाबीन दाखल होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सोयाबीनचा कमाल दर 3 हजार 860 असतानाही शेतकऱ्यांच्या पदरी केवळ 2 हजार 700 रुपये पडत आहेत.
खरीप हंगामातील पिकांचे दरही घटले अन् आवकही हेही वाचा -अयोद्धेबाबत न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करू - कादर मलबारी
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ जिल्ह्यातुनच नव्हे मराठवाड्यातून शेती मालाची आवक होते. शिवाय सोयाबीन हे प्रमुख पीक असल्याने त्याचे दरही येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमधूनच ठरतात. यंदा मात्र, सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे. ऐन दिवाळीच्या दरम्यान दरवर्षची आवक ही 20 ते 25 हजार क्विंटलच्या घरात असते.
यंदा मात्र, उत्पादनात घट झाली असून अनेक ठिकाणी अजूनही खरिपातील पिके ही जमिनीतच आहेत. तर, आवक झालेली पिकेही पावसामुळे काळवंडलेली आहेत. त्यामुळे याचा दरावर परिणाम होत असून सध्या शेतकऱ्यांना 2700 ते 2900 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. सोयाबीन बरोबरच खरिपातील हरभरा, मूग, तूर, उडीद या पिकांची आवक होत असली तरी गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. अद्यापही पिकांची काढणी बाकी असून सध्याच्या दराने तरी खरेदी होते की नाही याची चिंता शेतकऱ्यांना आहे. गुरुवारी येथील बाजारपेठेत सोयाबीनची आवक ही 13 हजार 167 क्विंटल तर त्यापाठोपाठ उडीद 820, मूग 548 तर हरभरा 509 क्विंटलची झाली होती.
हेही वाचा -चंद्रकांत पाटलांनी बजावले नोटीस म्हणजे सामान्य मुलीला दिलेली धमकी - कल्याणी माणगावे
खरीप लांबल्याचा परिणाम रब्बीवरही
पावसामुळे खरीप हंगामातील काढणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी अद्यापही जमिनीची मशागत झालेली नाही. शिवाय शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याने रब्बीचा पेरा केव्हा होणार याबाबतही शंका उपस्थित होत आहे. एकंदरीत हंगामाच्या सुरुवातीला पावसाची अवकृपा आणि अंतिम टप्प्यात झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.