लातूर - पारंपरिक शेती पद्धतीमध्ये वेळेचा अपव्यय आणि अधिक परिश्रम हे ठरलेलेच आहे. यावर पर्याय काढत चाकूर तालुक्यातील शेतकऱ्याने वेगळी शक्कल लढवली. त्याने 20 एकरातील खरिप पिकांची कोळपणी केली आहे. मात्र, यासाठी त्याने दुचाकीलाच यंत्राची जोड दिली आणि कोळपणीला सुरवात केली.
यंदा प्रथमच योग्य वेळी पावसाचे आगमन झाले आणि खरिपातील पेरणी वेळेत झाली. शिवाय पावसामध्ये सातत्य राहिल्यामुळे तूर, उडीद, मूग, सोयाबीन ही पिके बहरात आहेत. सध्या शेत शिवारात मशागतीची कामे जोमात सुरू आहेत. अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने मशागत करीत असले तरी चाकूर तालुक्यातील गारोळ येथील सलीम हमीद शेख याने वेगळी शक्कल लढवली आहे. दुचाकीलाच डुब्याचे यंत्र बसविले आहे. शिवाय एकाच वेळी तीन ठिकाणचे काम होते असल्याने वेळेची तर बचत झाली आहे शिवाय कष्टही कमी करावे लागत आहे. एकरभर शेतीसाठी एक लिटर पेट्रोल लागत असल्याचे सलीम यांनी सांगितले आहे. त्यांनी घरणी लगतच्या शिवारात तब्बल 20 एक्कर शेत केले आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रात अत्याधुनिक साधनसामग्रीची मदत शेख कुटुंबियांना होत आहे.