लातूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क केल्या जाणार आहेत. कोरोना संशयित रुग्णांनी स्वतःहून समोर येण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून कोव्हिड-19 प्रादुर्भावास महामारी घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये तर पैशाअभावी रुग्ण समोर न आल्यास धोका वाढतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोव्हिड-19 संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे निशुल्क करण्यात येणार आहेत.