लातूर - जिल्ह्यात आतापर्यंत शासकीय रुग्णालयातच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, गेल्या 15 दिवसांतील वाढती रुग्णांची संख्या पाहता आता खासगी रुग्णालये जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. शहरातील श्रीमती फुलबाई भाऊसाहेब बनसुडे हे पहिले खासगी रुग्णालय आहे जिथे कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1 हजारांहून अधिक झाली आहे. त्यापैकी शहरात सर्वाधिक रुग्ण असून 128 ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषीत करण्यात आले आहेत. सध्या कोरोनाबाधितांवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू असून शहरातील वेगवेगळ्या भागात विलगिकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र, महानगरपालिका हद्दीतील श्रीमती फुलबाई भाऊसाहेब बनसुडे रुग्णालयामध्येही आता उपचार सुरू झाले आहेत. रविवारी (दि. 19 जुलै) या ठिकाणी एक रुग्ण दाखल करण्यात आला होता. शिवाय महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या रुग्णालयाची पाहणी केली आहे.