लातूर - जिल्ह्यातील रामेगाव येथील शितल फावडे यांनी निलंगा येथील प्रसिद्ध 'सुर्यवंशी डिलिव्हरी अॅन्ड लेडीज हॉस्पीटल' व 'कुडुंबले हॉस्पीटल अॅन्ड सोनोग्राफी सेंटर' येथे बाळंतपणात वैद्यकीय सेवा घेतली. परंतु त्यांचे बाळ एक हात नसलेले जन्मल्याने त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. यावेळी वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याबद्दल ग्राहक मंचाने दोन्ही रुग्णालयाविरोधात १२ फेब्रुवारीला निकाल देत एकूण ४ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
सन २०१६ मध्ये रामेगाव येथील शितल फावडे यांनी आपल्या बाळंतपणात निलंगा येथील सुर्यवंशी डिलिव्हरी अॅन्ड लेडीज हॉस्पीटल व कुडुंबले हॉस्पीटल अॅन्ड सोनोग्राफी सेंटर येथे वैद्यकीय उपचार घेतला. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच संपूर्ण वैद्यकीय तपासणी आणि सोनोग्राफी करून घेतल्या. परंतु, प्रत्यक्षात जेव्हा बाळ जन्माला आले तेव्हा बाळाचा डाव्या बाजूचा हात कोपरापासून पुर्ण वाढ न झालेला दिसल्याने आई शितल व नातेवाईकांना मानसिक धक्का बसला. वैद्यकीय उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना याबाबत कोणतीही कल्पना दिली नाही. वैद्यकीय सेवेदरम्यान डॉक्टरांनी पालकांना सांगितले असते तर तेव्हाच योग्य उपचार घेतला असता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
याबाबत डॉ. गिरीधर सुर्यवंशी यांना त्यांनी जाबही विचारला. परंतु, डॉक्टरांनी अविर्भावात त्यांना उद्धट वागणूक देत काय करायचे आहे ते करा. माझे काहीच होत नाही, असे शब्द वापरल्याने नातेवाईकांनी याबाबत प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली होती. परंतु, यावर कोणतीच दखल घेतली नसल्याने शेवटी शितल फावडे यांनी अॅड. प्रशांत जाधव यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली. यावरून ग्राहक मंचाच्या वतीने लेखी जवाब नोंदवण्यात आला. त्यात सुर्यवंशी डिलिव्हरी अॅन्ड लेडीज हॉस्पीटल यांच्या डॉ. सुर्यवंशी यांनी जवाबास उपस्थित राहुन कोणतेच म्हणणे मांडले नाही. तर, कुडुंबले हॉस्पीटल अॅन्ड सोनोग्राफी सेंटरचे डॉ मल्लिकार्जुन कुडुंबले यांनी मी सोनोग्राफी केली नाही. तर, डॉ विक्रम कुडुंबले यांनी केली असून संबधितांनी केलेले आरोप खोटे आहेत, असे म्हणत आरोप फेटाळले. तसेच गर्भ १ आठवड्याचा असल्याने त्यांनी तिला केवळ आल्ट्रासाउंड आणि सोनोग्राफीचा सल्ला दिला होता. बाकी कोणतीही वैद्यकीय सेवा दिली नाही, असा जवाबही त्यांनी दिला.