लातूर- विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपची पिछेहाट झाली असताना आता त्यापाठोपाठ लातूर महानगरपालिकेतही भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. आज (शुक्रवार) महापौर पदाच्या निवडीत संख्याबळ असतानाही भाजपला सत्ता कायम ठेवता आली नाही. त्यामुळेच काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांना मोठा धक्का असून गतवैभव मिळवण्याच्या दृष्टीने काँग्रेस जिल्ह्यात आगेकूच करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
लातूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता हेही वाचा -किशोरी पेडणेकर; नर्स ते मुंबईच्या महापौरपदापर्यंतचा प्रवास
एकूण 70 नगरसेवक असलेल्या या महानगरपालिकेत भाजपचे 36, काँग्रेसचे 33 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 असे संख्याबळ होते. शुक्रवारी झालेल्या महापौर पदासाठी भाजपकडून शैलेश गोजमगुंडे तर उपमहापौर असलेले देविदास काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, ऐनवेळी देविदास काळे यांनी माघार घेतली आणि थेट लढत शैलेश गोजमगुंडे आणि काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांच्यात झाली. भाजपच्या नगरसेविका गीता गोड आणि नगरसेवक चंदू बिराजदार यांच्यासह राष्ट्रवादीचे राजा मणियार यांनीही काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना हात उंचावून मतदान केले आणि चित्रच बदलले.
महानगरपालिकेची निवडणूक असली तरी आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का मानला जात आहे. तर, आमदार अमित देशमुख यांचे सध्याचे राज्याचे राजकारण आणि स्थानिक पातळीवरील वाढते प्रभुत्व यामुळे गतवैभव मिळत आहे. या सत्ता परिवर्तनामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकांमध्येही काँग्रेस आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे हे नक्की.