लातूर -कोरोनामुळे इतिहासात प्रथमच लातुरातील कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे क्लासेस परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले असून याचा लातूरच्या अर्थकारणावर ही परिणाम होणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागलेल्या असतात. ऐन व्हॅकेशनच्या कालावधीमध्येच हे क्लासेस बंद राहिल्याने अर्थकारणावर परिणाम होणार आहे.
लातुरातील शाळा महाविद्यालयापेक्षा येथील कोचिंग क्लासेसचा परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. दहावीची परीक्षा संपताच व्हॅकेशनसाठी हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असतात. यंदा मात्र, दहावीची परीक्षा अंतिम टप्यात असतानाच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा-महाविद्यालयांसह येथील शंभरहून अधिक क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत.