लातूर - महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारेंच्या प्रचारार्थ आज उदगीरमध्ये सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, दुपारचे ३ वाजून गेले तरी ही सभा सुरू झाली नाही. त्यामुळे उपस्थितांच्या घशाला कोरड पडल्याने अनेकांनी सभा ठिकाणाहून काढता पाय घेतला.
उपस्थितांच्या घशाला कोरड; मुख्यमंत्र्यांच्या सभेला उदगीरकरांनी फिरवली पाठ - प्रचारसभा
उदगीरमध्ये सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, दुपारचे ३ वाजून गेले तरी ही सभा सुरू झाली नाही. त्यामुळे उपस्थितांच्या घशाला कोरड पडल्याने अनेकांनी सभा ठिकाणाहून काढता पाय घेतला.
महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची शेवटच्या दिवशी सभा असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुरूवातीस ११ वाजता सुरू होणारी सभा १ वाजता होणार असल्याचे सांगितले. मात्र, ३ वाजून गेले तरी मुख्यमंत्री सभेठिकाणी आले नसल्याने अनेकांनी परत जाणे पसंत केले. यावेळी व्यासपीठावरून नेतेमंडळी नागरिकांना थांबण्याची विनंती करत होते. मात्र, नागरिक आणखी किती वेळ वाट पाहायची म्हणून ओरडत होते.
या सर्व प्रकारामुळे सभा ठिकाणी मागच्या बाजूस रिकाम्या खुर्च्या आढळून आल्या. तर बॅनर अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. यामुळे अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे टायमिंग चुकले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.