लातूर -कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले असून सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये उद्योग- व्यवसायाला तसेच शेती व्यवसायाशी निगडित बाबींना सूट देण्यात आली आहे. मात्र, शहरात दिवसेंदिवस गर्दी वाढत असून नियमांचे पालन केले जात नसेल तर संबंधित उद्योग- व्यवसाय बंद करण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हास्तरीय बैठकीत दिल्या आहेत.
4 मे पासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी वाईन शॉप आणि इतरत्र मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ निर्माण झाली होती. त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आढावा बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह इतर विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.