लातूर- नगरपंचायतीमध्ये नोकरी आणि राहत असलेली गायरानची जमीन नावावर करून देतो, म्हणत नगरपंचायतमधील वरीष्ठ लिपिकाने ३६ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार देवणी येथे घडला आहे. शिवाय या लिपिकानेच पीडित महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या प्रकरणी वरीष्ठ लिपीक श्रीपाद कुलकर्णी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
देवणी शहरालगत असलेल्या गायरान जमिनीवर ३६ वर्षीय महिला ही पती आणि मुलांसोबत राहत होती. गायरानची जमीन नावावर करून घरकूल मंजूर करून देतो, तसेच नगरपंचायतीमध्ये नोकरीही देतो, असे आमिष लिपीक कुलकर्णी (मुळ रा.परभणी) हा गेल्या वर्षभरापासून पीडितेला दाखवत होता. याच कारणाने त्याने महिलेला लातूर येथील एका लॉजवर बोलावून घेतले व पिण्याच्या पाण्यात काहीतरी पाजून लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. शिवाय गेल्या वर्षभरापासून लिपीक कुलकर्णीकडून असा प्रकार सातत्याने झाला असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर महिलेचे अश्लिल फोटो काढून तक्रार केली तर सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकीही त्याने दिली होती.