लातूर - रेना मध्यम प्रकल्पातील पाणी शेतीसाठी नाहीतर पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्याच्या मागणीसाठी रेणापूर येथील नागरिकांनी थेट प्रकल्पातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ऐन टंचाईच्या काळात या प्रकल्पातील पाणी शेतीला सोडून प्रशासन आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
रेना मध्यम प्रकल्पातच 'या' कारणासाठी नागरिकांचा ठिय्या... रेणापूरसह पानगाव दहा खेडी, रेणापूर पूरक बिटरगाव पाच खेडी यासारख्या ५२ गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. असे असताना आता रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील या प्रकल्पातून पाणी शेतीसाठी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेतला आहे. त्यामुळे केवळ रब्बी हंगामातील पिकांसाठी नाही. तर या परिसरातील ऊस जोपासण्यासाठी ही भूमिका घेतली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
हेही वाचा....'गायीं'वर आधारित शेती करणाऱ्यांना दर महिन्याला मिळणार नऊशे रुपये
फेब्रुवारी अखेर या प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणी राहिले आहे. असे असताना हेच पाणी शेतीसाठी सोडल्यास पुन्हा या गावात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रकल्पाच्या पात्रातच नागरिकांनी ठिय्या दिला आहे. तर हे पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्याची मागणी करीत रेणापूर शहर बंद ठेवण्यात आले होते.
गुरुवारी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे पाणी सोडण्याचे आदेश नसतानाही ही भूमिका का घेतली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने घेतलेला निर्णय माघारी घेणार का ? हे पहावे लागणार आहे.