लातूर-खवय्यांसाठी लातुररात 'चिकन फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले होते. चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होते, अशा प्रकारचे संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, प्रत्यक्षात चिकनचा आणि या कोरोना विषाणूचा संबंध नसल्याचे पटवून सांगण्यासाठी या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.
'चिकन फेस्टिव्हल'चे आयोजन.... हेही वाचा-उत्तर प्रदेशातील जोडप्याला ओडिशाच्या रूग्णालयात केले दाखल; कोरोनाची लागण झाल्याचा संशय..
कोरोना विषाणू आणि चिकन याबाबत अपप्रचार केला जात आहे. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चिकन विक्रीवर परिणाम झाला आहे. चिकनची विक्री निम्म्याने घटली आहे. याबाबत पोल्ट्री फार्मर्स आणि चिकन सेंटर असोसिएशन यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, असे असतानाही विक्री वाढत नसल्याने अखेर या चिकन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले.
फेस्टिव्हलमध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, जिल्हा पशू संवर्धन उपायुक्त शैलेश केंडे, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची उपस्थिती होती. दोन हजार नागरिकांना याचा लाभ मिळेल अशी सोय आयोजकांकडून करण्यात आली होती. तर 105 रुपयांची चिकन प्लेट या फेस्टिव्हलमध्ये केवळ 50 रुपयात देण्यात आली होती.
त्यामुळे आता या चिकन फेस्टिव्हल नंतर नागरिकांमधील गैरसमज दूर होईल आणि चिकन विक्री पूर्वपदावर येईल, असा आशावाद यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला आहे.