लातूर -चाकूर पंचायत समितीमधील तब्बल 42 कर्मचाऱ्यांना तालुक्याच्या गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पंचनामा मनसेने केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
चाकूर पंचायत समितीच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असण्याचे प्रकार दिसून आले होते. तसेच अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत होती. त्यामुळेच चाकूर येथील पंचायत समितीमधील कारभाराचा पंचनामा मनसेने केला. यापूर्वी नागरिकांनी तक्रारी करूनही लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत होते.
मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नृसिंह भिकाने यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार केला होता. डॉ. भिकाने यांनी 15 दिवसांपूर्वीच पशुवैद्यकीय कार्यालयाचे काही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. पंचायत समिती येथील अधिकारी उपस्थित नसलेल्या खुर्चीचे फोटो शनिवारी काढण्यात आले. तर कार्यालयीन वेळेत न येणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रवेशद्वारावर फूल देऊन स्वागत केले.