लातूर(निलंगा) - मुंबईहून निलंगा तालुक्यातील कोराळी येथे आलेल्या सहा जणांना कोरोना विषाणूची लागण झाली. ही बाब समोर येताच त्यांच्या सोबत प्रवास केलेल्या १३ जणांना प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. मुंबईहून अनाधिकृत प्रवासकरून जिल्हाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा कोरोनाबाधितांसह एकूण २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले.
नागरिकांना आपापल्या गावी जाण्यासाठी शासन आरोग्य तपासणी करुन रितसर परवानगी देत आहे. मात्र, तरीही अनेक नागरीक छुप्या मार्गाने गावाकडे येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असेच मुंबई आणि ठाणे येथून काही नागरिक निलंगा तालुक्यातील कोराळी येथे दाखल झाले. याची माहिती मिळताच सात जणांना प्रशासनाने ताब्यात घेतले. त्यापैकी सहाजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. प्रशासनाने तत्काळ कासारशिरसी आणि कोराळी गाव सील केले.
अधिक तपास केला असता हे सर्वजण एका खासगी गाडीने आल्याचे समोर आले. त्या गाडीत निलंगा तालुक्यातील अनसरवाडा, लांबोटा व देवणी तालुक्यातील १३ जणांनी प्रवास केल्याचे समजताच प्रशासनाने त्यांनाही ताब्यात घेऊन शासकीय विश्रामगृहातील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले. त्यांच्या कुटुंबातील नागरिकांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या. हे सर्व वीसजण विनापरवाना जिल्ह्यात दाखल झाल्याने त्यांच्यावर जिल्हाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासार शिरसी येथील एका व्यापाऱ्यावरही गुन्हा दाखल -
कोराळीच्या त्या सात जणांना उमरगा येथील चेकपोस्टवर अडवले असता, कासार शिरसी येथील एका सिमेंट व्यापाऱ्याने त्या ठिकाणी जाऊन पोलिसांची दिशाभूल केली. या सर्वांची तपासणी करून क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवतो असे सांगून स्वत:च्या गाडीतून कासार शिरसी येथील क्वारंटाईन सेंटरपर्यंत आणले. मात्र, त्यांना त्या ठिकाणी न ठेवता एका पिकअप गाडीतून कोराळी येथे घरी सोडल्याची बाब समोर आली. प्रशासनाने तत्काळ त्या व्यापाऱ्याला ताब्यात घेऊन क्वारंटाईन केले आहे. मागच्या तीन-चार दिवसात हा व्यापारी अनेकांच्या संपर्कात आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.