लातूर- संचारबंदी लागू असतानाही अनेक जण मॉर्निंग वॉकला जात होते. पोलीस प्रशासनाने अनेक वेळा सूचना करूनही नागरिकांची रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने अखेर आज (दि. 2 एप्रिल) 120 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या सर्वांना शिवाजी नगर ठाण्यात नेण्यात आले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही सकाळच्या प्रहरी कोण कारवाई करणार या अविर्भावात औसा रोड, रिंग रोडवर लातूरकर मॉर्निंग वॉकसाठी जात होते. बुधवारी (दि 1 एप्रिल) जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनीच सहा जणांवर कारवाई केल्यानंतर आज (गुरूवार) सकाळी शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच महानगपालिकेचे अधिकारी यांनी औसा रोडवर मॉर्निंग वॉकला आलेल्या तब्बल 120 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये १० महिला असून ११० हे पुरूष आहेत. या सर्वांवर भा.दं. वि.चे कलम 188, 269, 270 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.