निलंगा (लातूर)- गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळातील वाहकांकडून ई.टी.आय.एम. मशीनची मागणी होत आहे. मात्र, वारंवार मागणी करूनसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज वाहकांनी निलंगा बसस्थानकासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. याबाबत मागण्यांचे निवेदन लातूर विभागीय नियंत्रक यांना देण्यात आले आहे.
निलंगा आगारात ई.टी.आय.एम मशीनचा तुटवडा आहे. त्यामुळे, वाहकांना मॅन्युअल ट्रेवर काम करावे लागत आहे. त्यामुळे, सर्व वाहकांना त्रास होत आहे. त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. तसेच, एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नावर देखील परिणाम होत आहे. मशीन अभावी सामान्यांनाही गैरसोय होत आहे. अपंग व्यक्तींची वन फोरची सवलत नोंद होत नसल्याने ७५ टक्के आर्थिक नुकसान होत आहे. बरेच जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्डच्या सवलतीचा वापर करीत आहेत. मात्र, मशीन नसल्याने त्यांची ५० टक्के सवलत बुडत चालली आहे. तसेच, सरकारी पत्रकार, स्वतंत्र सैनिक, दलित मित्र, असे अनेक सवलती धारक, जे स्मार्ट कार्डचा वापर करतात त्यांची नोंद होत नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे.