लातूर- निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील पिके पाण्यात असून मदतीबाबत राज्यसरकार उदासीन आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन अहमदपूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार मदत करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, तूर या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी १५ दिवस उलटूनही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडले नाही. एकीकडे कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यात पावसामुळे हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक नष्ट झाले आहे. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. जिल्ह्यात ४ लाख ५९ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. अंतिम टप्प्यात अहमदपूर, जळकोट, उदगीर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने अद्यापही पिके पाण्यातच आहेत. त्यामुळे, त्वरित पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मागणी करीत आज अहमदपूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपकडून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.