लातूर - कोरोनानंतर जनता आर्थिक समस्येला सामोरे जात आहे. वीजबिलासंदर्भात सरकारची कोणतीही रणनीती ठरलेली नाही. आता सक्तीची वीजबिलवसुली केली तर भाजपाच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जाणार असल्याचा इशारा विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. बुधवारी त्यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना यासंदर्भात निवेदन दिले तर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
'वेळप्रसंगी तुरुंगात जाणार'
सर्वसामान्य जनतेसह शेतकरीही कोरोना सारख्या महामारीत होरपळाला आहे. अद्यापही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. असे असतानाच वीजबिलवसुली सक्तीने करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. हा निर्णय अन्यायकारक असून सक्तीच्या वसुलीला भाजपाचा विरोध राहणार आहे. वेळप्रसंगी तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी हरकत नाही, पण सक्तीची वसुली होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
'विविध मागण्यांचे निवेदन'
कोरोनापाठोपाठ अतिवृष्टीसारख्या संकटाला राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते. पंचनामे झाले मात्र, अद्यापही मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन विरोधीपक्ष नेते दरेकर यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आ. संभाजी पाटील- निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे यांची उपस्थिती होती.
'विकासकामांकडे दुर्लक्ष'
महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन वर्ष उलटले तरी सत्ता कशी टिकून राहील, हाच प्रश्न या तिन्ही पक्षातील नेत्यांसमोर आहे. त्यामुळे विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय जनतेला धारेवर धरून वीजबिलवसुली सक्तीची केली जात असल्याने जनतेमधून रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे वीजबिलवसुलीच्या विरोधात राज्यभर आंदोलन उभे केले जाणार आहे. लातूर जिल्ह्यात आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन उभे केले जाणार असल्याचे यावेळी दरेकर यांनी स्पष्ट केले.