लातूर- कोरोनाच्या संकटात औसा नगर परिषदेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. औसा नगर परिषदेने परजिल्ह्यातून आलेल्या महिलेची आरोग्य तपासणी करून तिला चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून घरी सोडलं. याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याविषयावरुन नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या परजिल्ह्यातून येणाऱ्या नागिरकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरात दाखल होताच या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. यानुसार औसा येथे दाखल झालेल्या महिलेची शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली आणि तिचा अहवालही देण्यात आला. यानतर महिलेला घरी सोडण्याची वेळ आली, तेव्हा चक्क कचरा गाडीचा वापर करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून गावी येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलेला अशाप्रकारे वागणूक दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.