लातूर- आधीच दुष्काळाने होरपळलेल्या निलंगा तालुक्यातील भुतमुगळी गावातल्या एका शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. अज्ञात व्यक्तीने गोठ्याला लावलेल्या आगीत एक गाय जागीच ठार तर दोन बैल गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. विठ्ठल उनसनाळे असे त्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे दुष्काळात तेरावा अशी गत उनसनाळे कुटुंबीयांची झाली आहे.
निलंगा तालुक्यातील भुतमुगळी येथील शिवारात विठ्ठल उनसनाळे यांची नऊ एकर जमीन आहे. शनिवारी सांयकाळी नेहमीप्रमाणे उनसनाळे हे दोन बैलांसह एक गायीला गोठ्यात बांधून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गोठ्याला आग लावली. या दुर्घटनेत त्यांची गाय जळून जागीच ठार झाली. तर दोन बैल भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.