लातूर - परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरिपातील पिके तर, पाण्यासोबत वाहून गेली आहेत. शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. कोरोनाचे संकट आणि आता नैसर्गिक संकट यामुळे राज्य सरकार अडचणीत असले तरी, शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. केंद्र-राज्य असा मतभेद न करता शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
परतीच्या पावसाने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच पीक पाहणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नैसर्गिक संकटामुळे हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले आहे. नुकसानाचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी नुकसान एवढे प्रचंड आहे की, शेतकऱ्यांना थेट हेक्टरी 50 हजार रुपये मिळणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी अतिरिक्त पाण्यामुळे नदीने प्रवाह बदलला आणि थेट शेतीमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे जमिनीही वाहून गेल्या आहेत.
केंद्र-राज्य हा मतभेद बाजूला सारून शेतकऱ्यांना मदत करावी - छत्रपती संभाजीराजे
केंद्र-राज्य असा मतभेद न करता शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
राज्य सरकार कर्ज काढण्याच्या तयारीत आहे. पण अशावेळी केंद्र सरकारनेही मदत करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत केंद्र-राज्य असा मतभेद न करता मदत मिळणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार असून केंद्राकडे नुकसान चे वास्तव मांडणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने समाजाचे मोठे नुकसान होत आहे. स्थगिती मिळण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना विविध परीक्षेअंतर्गत नियुक्ती देणे आवश्यक होते, त्यांना आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. हे दुर्दैवी असून राज्य सरकारनेही स्थगिती उठवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.