लातूर- ज्या पाणीप्रश्नावर विधानसभा निवडणुका ढवळून निघाल्या. आता तो पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान लोकप्रतिनिधी यांच्यासमोर आहे. त्यानुसार लातूरला उजणीचे तर उदगीरला लिंबोटीचे पाणी वर्षभरात पुरवठा करण्याचा मानस आहे. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच प्रधान सचिव यांच्याशी बैठकी झाल्या असल्याचे पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे.
पहिल्याच वेळी उदगीर मतदारसंघातून आमदार झालेले संजय बनसोडे यांच्यावर पाणी पुरवठा, भूकंप पुनर्वसन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री पद सोपविण्यात आले आहे. शहरासह उदगीर, अहमदपूर या मतदारसंघात पाणी प्रश्न कायम आहे. यंदा परतीच्या पावसाने लातूरकरांची तहान भागवली असली तरी भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न कायम राहणार आहे. सबंध विधानसभा निवडणूक याच मुद्द्यांच्या भोवती फिरत होती. आघाडी आणि युतीच्या नेत्यांनी सबंध प्रचारात उजनीच्या पाण्याचा मुद्दा मांडला होता. तर, सत्ता स्थापन होताच रखडलेला पाणीप्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले होते.