लातूर- अवैध दारूविक्रीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांच्याच विरोधात औराद शहाजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जवळपास ३० महिला व पुरुषांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रताप औराद शहाजनी पोलिसांनी केला होता. याबाबत समाजात तीव्र पडसाद उमटताच सदर बाबीची दखल घेत गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुरुंदकर यांच्या चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले.
माहिती देताना महिला ग्रामस्थ औराद शहाजनी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोरसुरी येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू आणि मटका त्याचबरोबर, कासारशिरसी भागात ताडी हातभट्टीची चार दुकाने सर्रासपणे थाटून दारू विक्री करण्यात येत होती. हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. मात्र, पोलिसांचा मासिक मलिदा बंद होतो यामुळे सदर बाबींकडे दुर्लक्ष होत होते. वारंवार सांगूनही प्रशासन कोणतेही कारवाई करत नसल्याने या अवैध धंद्याच्या विरोधात बोरसुरी येथील महिलांनी एल्गार पुकारला. महिलांनी २७ डिसेंबर रोजी दारू आड्यातील ताडी हातभट्टीतील दारूच्या बाटल्या रस्त्यावर आणून फोडल्या. आणि औराद पोलीसांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
त्यानंतर महिलांद्वारे केलेल्या कारवाईचा राग धरून पोलिसांनी दारू विक्रेत्यांना संरक्षण देत दारुविक्री करणाऱ्यांकडून अर्ज घेतले. त्यानंतर पोलिसांनी ३० महिला व पुरुषांवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले. याबाबत तालुक्यात सर्वत्र पोलिसांच्या विरोधात संतापाची लाट उसळली. पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत बोरसुरीच्या शेकडो महिला व पुरुषांनी काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आणि आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन दारुविक्रेत्यांना पाठीशी घालणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासन व मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली.
सदरील बाब प्रसारमाध्यमांनी प्रखरपणे मांडताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुरुंदकर यांची तडकाफडकी लातूर येथे बदली करण्यात आली. एवढेच नव्हे तर सदरील बाबीची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे आदेश गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्याची माहिती स्वत: देसाई यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली. त्यामुळे कुरुंदकर यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा-महाराष्ट्र केसरी : शैलेशच्या विजयासाठी ग्रामस्थांनी घातलं भीमाशंकरला साकडं