लातूर -लॉकडाऊनमधील वाढीव वीज बिलाने ग्राहक त्रस्त आहेत. वाढीव बिल अदा करण्यावरून आतापर्यंत मोर्चे, आंदोलने पार पडली आहेत. मात्र, पर्याय आतापर्यंत समोर आला नाही. असे असतानाच उदगीर तालुक्यातील हेर येथील एका ऑटोचालकाला चक्क 56 हजार बिल आकारण्यात आले आहे. त्यामुळे बिल अदा कसे करावे हा प्रश्न भेडसावत असून दस्तगीर शेख यांनी महावितरणकडेही तक्रार नोंद केली आहे.
महावितरणचा शॉक: ऑटोचालकाला चक्क 56 हजारांचे बिल - रीक्षा चालकाला 56 हजारांचे बिल
वाढीव वीजबिल संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी सुरू आहेत. एकीकडे राज्यसरकार बिलाच्या सक्तीबाबत निर्णय घेत आहे तर दुसरीकडे वाढीव बिलामुळे ग्राहक हे त्रस्त आहेत. एका ऑटोचालकाला चक्क 56 हजार बिल आल्याने त्यांनी तक्रार नोंदवली आहे. मात्र, याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.
उदगीर तालुक्यातील हेर येथील दस्तगीर शेख हे ऑटोरिक्षा चालवून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. महिन्याकाठी मिळणाऱ्या 8 ते 10 हजारावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात पण या महिन्यात त्यांना चक्क 56 हजाराचे बिल आले आहे. दस्तगीर शेख यांच्या घरी 6 वॉटचे दोन बल्ब, एक टीव्ही आणि एक पंखा आहे. या विद्युत प्रवाहावर 40 युनिट पडतात. त्यानुसार महिन्याकाठी 800 ते 1000 रुपये बिल आकारले जाते. शिवाय शेख हे नियमित महिन्याला बिलही भरतात. मात्र, या महिन्यात त्यांना चक्क 56 हजार एवढे बिल आकारण्यात आले आहे. नोव्हबर महिन्यात शॉक बसला तो लाईट बिलाचा त्यांना 1315 युनिट वापरल्याचे बिल आले ते ही 17 हजार रुपयांचे. त्यांनी तक्रार केली मात्र, त्यावर सुधारणा करण्याऐवजी महावितरण ने दर महिन्याला त्याचे वीज वापर वाढत गेल्याचे दाखवत एक महिन्याचे बिल चक्क 56 हजार केले. त्याच्या वेळोवेळीच्या तक्रारी ची दखल घेत महावितरण कर्मचारी तेथे आले. मीटर मधील दोष आहे असे ही त्यांनी सांगितले आहे.