लातूर -जिल्ह्याबरोबरच शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या जिल्ह्यात 723 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक रुग्ण लातूर शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर मनपाने धारावी पॅटर्न राबविण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन सुरू असूनही रुग्णांचा आकडा वाढत आहे. लातूर शहरात 250 हून अधिक कंटेनमेंट झोन आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्याही लातूर शहरात जास्त आहे. त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख यांनी येथील विश्रामगृहात मनपा अधिकारी आणि नगरसेवक यांची बैठक घेतली होती. शहरातील प्रत्येक विभागात एक नमुना तपासणी केंद्र उभारावे.
शहरात कोरोना तपासणीची संख्या वाढवावी, शिवाय प्रभागनिहाय टास्क फोर्सची निर्मिती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. शहरात येणाऱ्या वाहन धारकांची चाचणी करण्याची व्यवस्था पेट्रोल पंपावर करण्यात यावी. यासारख्या उपाययोजना राबविल्या तर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे, असे अमित देशमुख म्हणाले.
सध्या शहरातील जवळपास सर्वच प्रभागात कोरोनाचे रुग्ण आहेत. वाढती संख्या लक्षात घेता शासकीय रुग्णालयात खाटा वाढवणे गरजेचे आहे. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेण्यासाठी देशमुख यांनी बैठक घेतली. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी 1 लाख रॅपिड अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा बंद आहेत.15 जुलैपासून सुरू झालेले लॉकडाऊन आज संपणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लॉकडाऊन वाढवतात की नियम अटीसह बाजारपेठ सुरु करण्यास परवानगी देतात हे पाहावे लागणार आहे.